'पुस्तक हे संस्कृतीचे मस्तक आहे.'
"ग्रंथ आमुचे साथी ग्रंथ आमुचे हाती,
ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या राती.''
या उक्ती ज्या पुस्तकाला तंतोतंत लागू ठरतात,गेली८४ वर्षे मराठी साहित्य नि मराठी मनावर अधिराज्य गाजवणारे पुस्तक म्हणजे संस्काराचा अमृतकुंभ,मातृप्रेमाचे महन्मंगल स्रोत 'श्यामची आई.'सानेगुरुजी नि श्यामची आई ही नावे ऐकली नाहीत असा मराठी माणूस असेल असे मला वाटत नाही. याच पुस्तकावर बहुआयामी व्यक्तिमत्त्व, साहित्य सम्राट आचार्य अत्रेंनी श्यामची आई चित्रपट निर्माण केला.त्याविषयी थोडेसे..
मराठीतील राष्ट्रपती पुरस्कार विजेता पहिला चित्रपट.आचार्य अत्रेंनी तन,मन,धन ओतून निर्माण केलेला हा चित्रपट.दामुण्णा जोशी, वनमाला नि बालकलाकार माधव वझे यांच्या प्रमुख भूमिका. 'छडी वाजे छमछम, भरजरीग पितांबर दिधला आणून, आई म्हणून कोणी' ही गाणी आजही मराठी मनाचा ठाव घेतात.
या चित्रपटाचे उद्घाटन ,6 मार्च 1953ला मुंबईत वेगळ्याच प्रकारे करण्यात आले. चित्रपती व्ही. शांताराम यांची आई, आचार्य अत्रेंची आई, श्यामची भूमिका करणाऱ्या माधव वझेंची आई, साने गुरुजींची बहिण नि मावशी या पाच मातांच्या हस्ते या चित्रपटाचे उद्घाटन (आजच्या भाषेत प्रीमियर शो ) करण्यात आले.
दुसऱ्याच वर्षी म्हणजे 2 ऑक्टोंबर 1954 ला या चित्रपटाला राष्ट्रपती सुवर्ण पदक जाहीर झाले. या पुरस्कार वितरण सोहळ्यात आचार्य अत्रे मनोगत व्यक्त करताना म्हणाले, "कथा सानेगुरुजींची, चित्रपटाचा मुहूर्त श्री.जयप्रकाशजींनी केला, त्याला आशीर्वाद संत विनोबांनी दिला. मग अशा चित्रपटाचा भारताच्या प्रजासत्ताक राज्याच्या अध्यक्षांकडून सर्वोत्तम चित्रपट म्हणून गौरव होऊ नये तर काय व्हावे?" यावेळी कार्यक्रमला उपस्थित असणारे अभिनेते अशोककुमार अत्र्यांचे अभिनंदन करताना म्हणाले," या छोट्या भाषणासाठीही तुम्हाला सुवर्णपदक द्यायला हवे."
यानंतर हा चित्रपट करमुक्त करून शाळांशाळांमध्ये दाखवण्यात आला.या यशानंतर आचार्य अत्रेंचे सत्कार महाराष्ट्रभर झाले. एका मोठ्या समारंभात सत्काराला उत्तर देताना अत्रे म्हणाले होते, "सत्कार समारंभाला जमलेल्या एवढ्या लोकांनी जरी श्यामची आई चित्रपट पाहिला असता तरी मला कर्जबाजारी होण्याची वेळ आली नसती."
पण अत्र्यांच्या मनात एका गोष्टीचे दुःख होते. सप्टेंबरमध्ये त्यांच्या आईचे दुःखद निधन झाले होते. तिच्या अस्थी गंगेत विसर्जित करून ते दिल्लीला होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाला उपस्थित राहण्यासाठी गेले. तिथे त्यांना श्यामची आई चित्रपटाला सुवर्ण पदक मिळाल्याची बातमी समजताच त्यांच्या मनात आले, 'उभ्या महाराष्ट्राला मी साने गुरुजींची श्यामची आई दाखवली. पण तिला मिळालेले यश पाहण्यास माझी आई हयात नाही.' आपल्या आईच्या आठवणीने हा पोलादी पुरुष काहीकाळ गहिवरला. साने गुरुजींनी पुस्तकरुपाने उभी केलेली 'श्यामची आई' आचार्य अत्र्यांनी भारतातील पहिला सुवर्ण पदक विजेता चित्रपट म्हणून अजरामर केले.
- राजेंद्र कणसे
संदर्भ - मी कसा झालो
व संकलन.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा