दिवाळीला गावच्या वेशीवर थंडी येते असे म्हणतात. दिवाळी नि गुलाबी थंडी हे समिकरण ठरलेले. दिवाळी झाली की पूर्वी संध्याकाळी नि सकाळी गावात शेकोट्या पेटायच्या नि शेकोट्या भोवतीच्या गप्पा रंगायच्या. तसेच गावात भाऊबीजेपासून जणू सांस्कृतिक चळवळच सुरू व्हायची. ती म्हणजे मराठी चित्रपट, कोल्हापूरची म्युझिकल पार्टी. अंगापूर वंदन मध्ये मराठी शाळेच्या पाठीमागची जागा,बाजार पठांगण नि गणपती मंदिर तर अंगापूर तर्फ मध्ये बागेत ही ठिकाणे म्हणजे सिनेमाची ओपन थेयटरच.यापैकी जास्त सिनेमांसाठी सुरक्षित जागा (विना कनात लावता) म्हणजे मराठी शाळेचे मागचे पठांगण.पूर्वेकडील बाजूने दोन्ही इमारतीच्या मधील मोकळ्या जागेतून महिलांना प्रवेश व पश्चिमेकडून पुरुषांना प्रवेश एका बाजूने पूर्ण इमारत तर तिन्ही बाजूंनी इलायती शेराचे दाट कुंपण त्यामुळे घुसून जाणे हा विषयच नव्हता.
न्यू इंग्लिश स्कूल इमारत निधीसाठी साधारणतहा १९७४ ते १९८० दरम्यान. जय हनुमान व्यायाम मंडळ,बलभीम व्यायाम मंडळ, अंगापूर तर्फ मधील संत सावता माळी मंदिर मदतीसाठी विशेषतःचित्रपट घेतले जायचे.त्याची सुरवात शक्यतो भाऊबीजेपासून व्हायची.बाजार पटांगण,बागेत होणारे चित्रपट हे बाजूने कनात लावून व्हायचे. कनातीतून कोणी घुसून जावू नये म्हणून कनातीच्या उभ्या बांबूजवळ एक एक संबंधित मंडळाचा स्वयंसेवक असायचा.कोणत्या मंडळाचा कार्यक्रम आहे हे पाहून घुसणारांची संख्या असायची. तिकीट दर असायचा प्रौढांना १ रूपया व लहानांसाठी ५०पैसे. (सुरवातीला काहीवर्षे) चार पाच वर्षांखालील मुलांना मोफत. लहान म्हणजे सातवी पर्यंतचा. अशी प्रेक्षकांची ढोबळ मानाने वर्गवारी असायची.तिकिटाचे पैसे वाचवण्यासाठी मग आठवी नववीच्या मुलांने प्रवेशद्वारातून प्रवेश करताना लहान दिसण्यासाठी अर्ध्यातिकिटात जाण्यासाठी अनेक क्लुप्त्या करायच्या.तर सहा सात वर्षांच्या मुलांने लहान वाटण्यासाठी आईच्या, चुलतीच्या,मोठ्या बहिणीच्या कडेवर बसायचेअसे अनेक मजेदार किस्से व्हायचे.पुढे तिकीट दर दोन रुपये, पाच रुपये झाला.
तिकिट काढण्याची खिडकी म्हणजे बाहेरच्या बाजूला मोकळ्या बाजूला दोन तीन मोकळ्या बैलगाड्या घोडी लावून उभ्या केलेल्या. त्यात तिकीट फाडणारी संबंधित मंडळातील त्यातल्या त्यात हुशार कार्यकर्ते असायचे. त्यांनी ते काम चोख बजावायचे. चित्रपट सुरू झालातरी यांनी सर्व हिशोब पूर्ण करायचा. नि शक्यतो मध्यांतराला एकूण जमा-खर्च,फायदा तोटा जाहीर करायचा. महिन्यात किमान तीन चित्रपट तरी हमखास व्हायचे.त्यावेळी इतर करमणुकीची साधने नसल्यामुळे स्त्री पुरुषांची तोबा गर्दी व्हायची. संत सखुबाई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत चोखामेळा असे पौराणिक तर राजा शिवाजी, धन्य ते धनाजी संताजी सारखे ऐतिहासिक, तर सांगते ऐका, पाहुणी, हाथ लावीन तिथं सोनं, हऱ्या नाऱ्या जिदांबाद,सामना, लाखात अशी देखणी, सुगंधी कट्टा, बाळा गाऊ कशी अंगाई, दाम करी काम, माय बाप... ते लेक चालली सासरला.असे अनेक चित्रपट त्यातील नट, नट्या, कथानक गाण्यासह आठवणीत आहेत.
सोळा एम.एम.च्या पडद्यावर, तीन किंवा चार रिळचा असणारा, प्रेक्षकात मध्यभागी टेबलवर ठेवलेला प्रोजेक्टर, त्यावरती वर एक नि खाली एक अशी फिरणारी दोन रीळ, प्रोजेक्टर मधून बाहेर पडणारा प्रकाशाचा पडद्यावर पडणारा फोकस,त्यामध्ये हात, टॉवेल उडवणारी आगाऊ कार्टी. रीळ संपल्यानंतर लेमन गोळी, लेमन गोळी दहापैशाला दोन. असा येणारा आवाज हे सार चित्र आज पन्नाशीच्या आस पासच्या मंडळीच्या मनावर तसेच्या तसे कोरलेले आहे.
सात-आठ दिवस अगोदर चित्रपटाची जाहिरात व्हायची, चित्रपट असेल त्या दिवशी लाऊडस्पीकर वरून होणारी जाहिरात आज रात्रो ठिक साडेनऊ वाजता मराठी शाळेच्या भव्य पठांगणावर..,गडबड गुंडा नि लागलाय लोंडा,तिकिट काढा नि आपली जागा धरा, एक रुपयची काय किंमत बघा जयश्री गडकरची गमंत, सोडा रुमालाची गाठ नि धरा मराठी शाळेची वाट अशा गमंतीशीर घोषणा माईकवरुन व्हायच्या. काय मजा असायची ते ऐकताना. चित्रपट सुरु झाला की कौटुंबिक चित्रपट असलाकी आशा काळे,जयश्री गडकर,सुलोचना यांचे दुःख पाहून महिलांच्या बाजूने हुंदके ऐकू यायचे ,तर ललिता पवार, निळू फुले, राजशेखर यांना शिव्या दिलेल्याही ऐकू यायचे. एवढ्या समरसतेने सामुहिक रीत्या चित्रपट पाहिले जायचे.अनेक सामाजिक कामासाठी पैसा उभा करण्याचे साधन म्हणजे चित्रपट दाखवणे.
१९८४ नंतर चित्रपटांचे प्रमाण कमी होऊन त्याची जागा कोल्हापूरच्या डान्सींग पार्टीने(ऑर्केस्टा)घेतली. वैभव म्युझिकल नाईट,ललकार म्युझिकल नाईट,प्रकाश हिलगे,सुभाष हिलगे म्युझिकल नाईट यांचे कार्यक्रम होऊ लागले.याचे प्रमाण अंगापूर तर्फमध्ये जास्त होते.वसंत शिंदेचे मुख्य भूमिका असणारे नाटक 'लावणी भुलली अभंगाला',तर नटश्रेष्ठ निळू फुलेंचे प्रमुख भुमिका असणारे 'राजकारण गेलं चुलीत 'ही दोन नाटके अंगापूर तर्फमध्ये
पाहण्याची सुवर्ण संधी ही पंचक्रोशीतील लोकांना मिळाली.
काळाची पाने पलटली गेली. जसा टि.व्ही.चा छोटा पडदा आला तसे मोठ्या पडद्यावरील चित्रपटांची पाहण्याची संख्या कमी होऊ लागली. नि आता ती इतिहास जमा झाली. गेले ते दिवस उरल्या त्या आठवणी. भूतकाळाकडे कधीकधी मन डोकावते तेव्हा आठवणींची गर्दी उसळते.नि त्या आठवणी एखाद्या चित्रपटाप्रमाणे पुढे उभ्या राहतात. नि वाटतं पूर्वीचा काळ गरीबीचा,साधेपणाचा ,कष्टाचा पण किती सुखाचा,माणुसकीचा ,आपुलकीच्या ओलाव्यांचा.
आज भौतिक संपन्नतेच्या युगात सर्व काही मिळाले पण माणुसकीचा नि आपुलकीचा ओलावा मात्र सुकत चालला आहे.
- राजेंद्र कणसे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा