आचार्य अत्रे यांचा १३ जून हा पुण्यस्मरण दिन त्यानिमित्ताने या अवलिया व्यक्तिमत्वाविषयी थोडेसे..
एकावेळी दोन घोड्यावर मांड घालता येत नाही, एक ना धड भाराभर चिंध्या असे म्हटले जाते. पण हे खोटे ठरवणारा, हात लाविन त्याचे सोने करणारा, जाईल तिथे यशाचे गौरीशिखर गाठणारे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे साहित्यसम्राट, नाट्यलेखक,चित्रपट निर्माता, विडंबनकार, शिक्षण क्षेत्रात नवनिर्माण करणारा शिक्षणतज्ज्ञ, उत्तम राजकारणी, कवी, हजरजबाबी विनोदी लेखक नि लाखोंच्या सभा जिंकणारा फर्डा वक्ता म्हणजे प्रल्हाद केशव अत्रे.
संत तुकाराम, लो.टिळक, डॉ.आंबेडकर, स्वा.सावरकर, रा.ग.गडकरी हे पाच महामानव अत्र्यांनी गुरू मानले. लेखणी आणि वाणीचे सामर्थ्य काय असते हे महाराष्ट्राने अत्र्यांच्या रूपाने पाहिले.'भलेतरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हाणू काठी. 'यान्यायाने त्यांची लेखनी नि वाणी चालली. त्यांची व्यक्तिगत तत्वे, नि महाराष्ट्र हिताच्या आड कोणीही आला त्याला अत्र्यांनी सोडले नाही. प.नेहरू, आचार्य विनोबा, सावरकर, तर्कतीर्थ, लता मंगेशकर, यशवंतराव चव्हाण यांच्यावरही अत्र्यांनी बोचरी टिका केली. पण त्याच लेखणीने नि वाणीने महामानवांच्या मृत्युनंतर त्यांच्यावरती प्रदीर्घ लेख लिहून वाचकांचे डोळे ओले केले.पंडितजींच्या मृत्युनंतर त्यांनी 'सूर्यास्त' हा श्रंद्धांजलीपर लेख लिहला.डॉ.बाबासाहेब आंबेडकरच्या मृत्यूनंतर एकमेव श्रद्धांजली पर अत्र्यांचे भाषण झाले. सलग बारा दिवस बाबासाहेबांच्यावरती लेख लिहून आगळी वेगळी श्रद्धांजली त्यांनी वाहिली. साने गुरूजी, स्वा.सावरकर, संत गाडगे महाराज यांच्या मृत्युनंतरही त्यांनी असेच लेख लिहिले.
आज आम्ही महाराष्ट्रहे आमचे राज्य आहे हे ताठ मानेने सांगतो पण आपणाला माहिती नाही की आचार्य अत्रे जर हो म्हणाले असते तर या राज्याचे नाव महाराष्ट्राऐवजी मुंबई राज्य झाले असते.पं.नेहरुंचा हा निरोप यशवंतरावांनी एस एम जोशी मार्फत अत्र्यांना कळवला.त्यांनी त्यास ठाम विरोधच केला. महाराष्ट्र यानावाचा हा इतिहास किती जनांना माहिती आहे ?
अत्र्यांची वीस नाटके,पंधरा पुस्तके, दोन कविता संग्रह नि कर्हेचे पाणी हे पाच खंडांचे आत्मचरित्र मराठी साहित्यातील अनमोल ठेवा आहे.
नाना पाटलांना 'क्रांतिसिंह',सावरकरांना 'स्वातंत्र्यवीर',व्ही शांताराम यांना 'चित्रपती'ही उपाधी अत्र्यांनी दिली. तर अत्र्यांना पहिल्यांदा 'प्रिन्सिपॉल'असे जाहीर कार्यक्रमात सावरकरांनी संबोधले तिथून त्यांना आचार्य ही उपाधी लावली जाऊ लागली.
देह देवाचे मंदिर हा अभंग,व तू तर चाफेकळी हे श्रुंगारिक गीत अत्र्यांचे आहे.विनोद हा तर त्यांच्या व्यक्तिमत्वाचा महत्त्वाचा पैलू .याविषयी पुन्हा कधीतरी लिहिनच. आयुष्य भर अवखळ निर्झराप्रमाणे वाहणारा निर्मळ प्रवाह म्हणजे आचार्य अत्रे. आपल्या मृत्युविषयी अत्रे म्हणाले होते, "मी मेल्यावर माझी जर समाधी बांधली तर त्यावर एवढेच लिहा की हा माणूस मूर्ख होता, प्रमादशील होता, पण तो केव्हाही कृतघ्न नव्हता."
त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन..!!!
- राजेंद्र कणसे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा